Header Ads

नाथाभाऊंचा गुन्हा काय ?




विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहेत. आघडी, युती व इतर पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. युतीच्या घोषणेनंतर भारतीय जनता पक्षानेही मंगळवारी आपली १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीची जेवढी चर्चा रंगली नाही तेवढी चर्चा एकनाथ खडसेंचा (नाथाभाऊ) समावेश या पहिल्या यादीत नसल्याची रंगली. अर्थातच नाथाभाऊ हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ४२ वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. महाराष्ट्रात कमळ फुलवण्यात स्व. प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांच्यासोबत त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय. तसेच मागील काही दिवसांपासूनचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्यातील राजकीय संघर्षामुळे ही चर्चा रंगवली जाणे साहजिकच आहे. एकटे नाथाभाऊच नाहीत तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री राज पुरोहित व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले माजी मंत्री प्रकाश मेहता यांचेही पहिल्या यादीत नाव नसल्याने राजकीय पटलावर व माध्यमांमध्ये अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान नऊ आमदारांची तिकिटे कापली गेली असली तरी नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारीसाठी ताटकळत ठेवण्यामागे अनेक मोठे हात व संघटना आहेत. २००९ ते २०१४ दरम्यान महाराष्ट्र विधानसभेमधील विरोधी पक्षनेते असलेले नाथाभाऊ स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये अग्रस्थानी होते. नाथाभाऊ, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या बड्या नेत्यांना डावलून भाजप व रा. स्व संघ या त्यांच्या पितृ संघटनेने देवेंद्र फडणवीस या नवख्या खेळाडूला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसविले. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा ताज दिल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे २०१४ ते २०१६ या काळात दिसून येते. याच काळात पंकजा मुंडे, तावडे व नाथाभाऊंनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीरपणे बोलवून दाखवली होती. मुंडे यांनी तर मी जनतेच्या मनातील मुख्यंमत्री असल्याची भर सभेत डरकाळी फोडली होती. अशीच डरकाळी तावडे आणि नाथाभाऊंनी फोडली होती. मात्र मुंडे यांचा चिक्की घोटाळा बाहेर काढून त्यांना पद्धतशीर बाजूला सारत त्यांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. असाच प्रकार तावडे आणि नाथाभाऊंसोबत झाला. १९९५ पासून सलग सहावेळा मुक्ताईनगरमधून निवडून येणाऱ्या नाथाभाऊंना ४ जून २०१६ रोजी भ्रष्टाचारांच्या कथित आरोपांवरून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. या आरोपांबाबत पुढे काहीही निष्पन्न होऊ शकलं नसलं तरी नाथाभाऊंचा संघर्ष अद्याप थांबलेला दिसत नाही.

स्व. गोपीनाथजी मुंडे व प्रमोदजी महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी पक्ष वाढविला. २५ वर्ष स्वतःच्या हातून प्रत्येक निवडणुकीत तिकीट वाटपाची जबाबदारी पार पाडली. अशा या नेत्याचा समावेश पहिल्या यादीत झाला नसल्याने याचे दुःख काय असेल हे खुद्द नाथाभाऊंच सांगू शकतात. पिढी बदललली तशी भाजपचं राजकारणही बदललं. साम, दाम, दंड, भेद या तत्वांचे पालन करून फडणवीस सेनेने जो आड आला त्याला बाजूला करण्याचा विडाच उचलला आहे. विशेष म्हणजे भाजपात यापूर्वी असलेले गडकरी, मुंडे गटांचे फडणवीस गटात विलानीकरून करून मुंडे गट पूर्णपणे हद्दपार केल्याचे सध्यातरी चित्र दिसून येत आहे. अर्थातच मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे गटाचे अर्धे अवसान गळून पडले होते. त्यात या गटातील दोन नंबरचे नेते असलेले नाथाभाऊंचे खच्चीकरण करून काही संघटना व भाजपच्या बड्या नेत्यांनी हा गटच संपून टाकला. हा स्वतंत्र लेखाचा विषय असला तरी नाथाभाऊंचे खच्चीकरण का चालले आहे याचे उदाहरण आपल्याला यातून सापडते. असो, तर आक्रमक स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, फटकळ स्वभाव, मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा जाहीर बोलून दाखवणे व पक्षश्रेष्टींविरोधात जाहीर दंड थोपटणे हाच नाथाभाऊंचा गुन्हा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याचे कारण म्हणजे विरोधात बोलायचं नाही, तक्रार करायची नाही केल्यास काय होते ? याचे उदाहरण तयार करण्यासाठी नव्या भाजपने नाथाभाऊंचा राजकीय बळी घेतला आहे. याचा अपेक्षित परिणामही दिसून आला असून आपला खडसे नको म्हणून अनेकांनी राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या आपल्या शेपट्या गुंडाळून घेतल्या आहेत. त्यामुळे आता आपण फक्त एकच म्हणू शकतो 'कालाय तस्मै नमः'.

- विजय डोळे
9890740042

No comments