Header Ads

अंतर्मुख करायला लावणारा ‘द प्लॅटफॉर्म’


ध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने स्वतःमधील कच्चेदुवे दूर करण्यासोबतच मनोरंजन हा अविभाज्य भाग बनला आहे. जोडीला नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन असल्याने दिवस कसा सरतो कळत देखील नाही. परवा नेटफ्लिक्सवर सर्च करताना 'The Platform' हा चित्रपट दिसला आणि तो डाउनलोड करून ठेवला आणि अखेर आज पाहिला. मूळ विषयावर बोलावं असं तुम्हाला नक्कीच वाटत असणार कारण मी तिसरेच काहीतरी बडबडतोय असं तुम्हाला वाटत असेल तर नाही मी हे यासाठी सांगतोय की, मी रोज एक चित्रपट किंवा वेब सिरीज पाहत असतो मात्र सर्वच चित्रपटावर बोलावं किंवा लिहावं असं कधी वाटत नाही. अनेक चित्रपटाविषयी मी स्वतःशीच चर्चा करत असतो त्याविषयी विविध तद्यांची मते वाचत असतो. मात्र ‘द प्लॅटफॉर्म’ पाहिला आणि यावर लिहिल्याशिवाय बोलल्याशिवाय मला राहवलं नसत कारण आपल्याला अक्षरशः हादरवून टाकणारा हा चित्रपट आहे.



मूळ स्पॅनिश भाषेमधील असणारा हा चित्रपट गिल्डर गझतेलू-उरूतिया (Galder Gaztelu-Urrutia) या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. २०१९ साली TIFF मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र नेटफ्लेक्सवर सध्या त्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा एका खोल खड्ड्यासारख्या तुरुंगात घडते. या खड्ड्यामध्ये अनेक मजले आहेत कदाचित ३३३ पेक्षा जास्त मजले असू शकतात. प्रत्येक मजल्यावर दोन बेड म्हणजे दोनच व्यक्ती येथे राहू शकतात. यातील अनेक जणांनी स्वतःला बदलण्यासाठी, वाईट सवयी सोडण्यासाठी स्वतःहून यात कैद केलेले असते तर काहीजणांनी गुन्हा केल्याने त्यांची रवानगी या खड्ड्यामध्ये केलेली असते. अशाच प्रकारे गोरेंग (Goreng) नावाचा नायक या खड्ड्यात आपली सिगारेटची सवय, आवडतं पुस्तक वाचण्यासाठी व एक डिप्लोमा पूर्ण कारण्यासाठी यात स्वतःहून दाखल होतो. यानंतर कथानकाला सुरुवात होते. या खड्ड्याचे वैशिष्ठ्ये म्हणजे या खड्ड्यात प्रत्येक कैद्यांचे आपल्या आवडीचे पदार्थ बनवलेले जातात. यासोबतच शाही पद्धतीचे जेवण येथील कैद्याला दिले जाते. हे जेवण एका प्लॅटफॉर्मद्वारे प्रत्येक मजल्यावर पोहचवले जाते. साधारण ५१ मजल्यांपर्यंत हे खाणे पुरते तर उर्वरित मजल्यांवरील कैद्यांना पाण्यावरच दिवस काढावे लागतात. सर्वात महत्वाचे म्हणजे येथील कैद्यांचा प्रत्येक ३० दिवसांनंतर मजला बदलला जातो. बदलत्या मजल्यानुसार व दिवसांनुसार मानवी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. यातील सर्वात भयंकर दृश्य म्हणजे काटकोर देखरेखीखाली बनवलेल्या शाही पदार्थांनी भरलेला प्लॅटफॉर्म हा जसजसा खालच्या मजल्यावर जाईल तसतसा त्याचे होणारे विद्रुपीकरण तुम्ही पाहूच शकत नाही. जर अन्नच खायला नसेल तर मानवी प्रवृत्ती काय करू शकते याचे उत्तम उदाहरण पहायचे असेल तर तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. यातून तुम्हाला मानवी प्रवृत्तीचे, समाजात असलेल्या अनेक वर्गांचे दर्शन घडेल. 




‘द प्लॅटफॉर्म’मध्ये घडणारी कथा तुम्ही सध्याच्या परिस्थितीसोबतही तुम्ही जोडू शकता. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर देशात खरेदीसाठी जी झुंबड उडाली त्याचा या कथानकाशी संबंध आपण जोडू शकतो. जो खरेदी करू शकतो किंवा ज्याला शक्य आहे त्याने स्वतःचा विचार करत भरमसाठ साठा करून ठेवला. आपल्या मागील रांगेचा किंवा शेवटच्या घटकाचा त्याने कधीच विचार केला नाही आणि यापूर्वीही त्याने कधी तो विचार केला नाही. त्यामुळे तो अधिक सुखी झाला कारण त्याला शक्य आहे, त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहचत आहेत. मात्र समाजात अनेक घटक आहेत त्यांच्यापर्यंत मूलभूत गोष्टी पोहचत नाहीत आणि त्यांनी त्या मिळवण्यासाठी असंविधानिक पावले उचलली तर आपण त्यांना भिकार्डे, चोर किंवा दरोडेखोर म्हणतो. ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण सर्वजण घरात बसून शासनाने काय केलं पाहिजे काय नाही केले पाहिजे याच्या बढाया मारत असतो. तसेच लाखो मजूर नियमभंग करून शेकडो किलोमीटरचा रास्ता आपल्या कुटुंबाला घेऊन पायी कपात आहेत. हे असे का करत आहेत ? यामुळे कोरोचा संसर्ग आणखीन जास्त वाढू शकतो वगैरे वगैरे तत्वज्ञान पाजळून त्यांना शिव्या देत असतो. पण हा मजूर आपल्याकडील शेवटचा टप्पा जरी समाजाला तरी विचार करा पोटाची खळगी भरण्यासोबतच स्वतःचा जीव वाचवण्यासाठीची त्यांची ती धडपड असते. कारण मोठ्यांच्या मोठ्या शहरात त्यांना कोणताही आधार न दिसल्याने त्यांनी आपल्या घराची वाट पकडली आहे. मात्र आपण चार वेळेस प्रमाणापेक्षा जास्त खाऊन पंख्याच्या हवेखाली आपले वैचारिक वांझोटेपण दाखवत त्यांना शिव्या देत असतो. मात्र त्यांच्यावर काय परस्थिती असेल त्यांनी हे पाऊल का उचलेले असेल याचा आपण विचार करत नाही कारण त्यावेळी आपले पोट भरलेले असते व घरात मुबलक साठा असतो. याच मानवी प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो. डेविड डेसोला आणि पेड्रो रिवेरो यांनी बदलत्या परिस्थिनुसार बदलणारी मानवी प्रवृत्ती आणि समाजात असणाऱ्या अनेक वर्गावरच्या मूलतत्वाचा धागा पकडून या चित्रपटाचे लेखन करत समस्त मानव जातीला अंतर्मुख करायला लावले आहे. त्यामुळे मानवी प्रजातीचे खरे रूप पाहायचे असेल तर ‘द प्लॅटफॉर्म’ नक्की पाहा.

1 comment:

  1. एवढं वाचल्यानंतर नक्कीच पहावा लागेल

    ReplyDelete