Header Ads

एका सुंदर प्रेम कहाणीचा शेवट...!

Image result for boy crying in break up

ऱ्याच दिवसापासून दोघांची भेट झाली नव्हती. ती तिच्या कामात व्यस्त होती आणि हा हि त्याचा व्यवसाय वाढवण्यात व्यस्त होता. मध्यंतरी एक दिवस त्यांची भेट झाली. कॉफी झाल्यानंतर सहज तो तिला कपड्याच्या दुकानात घेऊन गेला. त्याला ब्लेझर ट्राय करायचा होता, मात्र तिची नजर ब्लेझर पेक्षा वेगळ्या गोष्टी शोधत होती हे त्याच्या लक्षात आलं होतं. न राहून त्याने तिला डिवचलं ' मॅडम, लग्नाचे वेध आतापासूनच लागले कि काय? आणि तो तिला घेऊन नवरदेवाचे कपडे पाहू लागला. तीन-चार शेरवानी आणि सूट पाहून झाल्यावर तिला एक पसंद पडला. मात्र ती जरा नर्व्हस वाटत होती. त्याच्या नजरेतून ते सुटणार नव्हतं. मात्र त्याने तिला जास्त काही विचारलं नाही. नंतर दोघांनी जेवण केलं आणि त्याने तिला तिच्या घरी सोडलं.

दरम्यानच्या काळात ती एवढी बोलत नव्हती. त्याने वरवर विचारलं आणि तिनेही वरवरचं उत्तर दिलं. पुन्हा काही दिवस ते एकमेकांच्या आयुष्यात व्यस्त झाले. फोनवर थोडंफार बोलणं होत होतं मात्र तिची बदललेली मानसिकता आणि चलबिचल याच्या लक्षात येत होती आणि तोही तिला विचारत होता, 'आजकालचं तुझं वागणं जरा विचित्र वाटत आहे? मात्र ती कामाचं कारण पुढे करून वेळ मारून नेत होती. एकदिवस न राहवून त्याने त्याचं काम सोडून तिचं लोकेशन गाठलं आणि तिला विचारू लागला कि 'बाई, नेमकं काय झालंय तुला अशी का वागतेस? यावेळीही तिने स्माईल करत उत्तर टाळलं आणि रात्री भेटू म्हणून निघून गेली.

अखेर इंतजार कि घडी कट गयी आणि तो तिला तिच्या लोकेशनवर घ्यायला गेला. ती त्याला एखादं निवांत हॉटेल शोध म्हणाली. मग तो तिला घेऊन एका शहराबाहेरील हॉटेलमध्ये गेला. बोलण्याची सुरुवात कोणी करत नव्हतं कारण बऱ्याच दिवसांनी दोघांची भेट होत असल्याने तो तिच्याकडं टक लावून बसला होता मात्र ती नजर चोरत होती. याला हे खटकलं आणि म्हणाला 'काय झालं सांगशील का? गेला महिना झालं पाहतोय तुझ्यात बराच बदल झालाय? फोनवर बोलत नाही, खुश असल्याचा भास आणतेस, मेसेजेला उत्तर नसतं, सतत मला टाळत असतेस. नेमकं कारण काय समजू शकेल का? तीने मान खाली घातली होती. अचानक मान वर करून म्हणाली, 'माझं लग्न जमलं रे राज्या! तो थोडा हसला आणि म्हणाला, 'मजाक करायला तुला दुसरा विषय नाही का?'. ती मात्र पुन्हा त्याला जड अंतःकरणाने सांगू लागली कि, 'घरच्यांनी एक स्थळ पाहिलंय, मुलगा मुंबईचा आहे. खूप श्रीमंत फॅमिली आहे आणि मुलगा पण हँडसम आणि समजुदार आहे. मी थकले, घरच्यांच्यापुढे आता जाऊ शकत नाही. माझे घरचे पण खूप खुश आहेत रे या स्थळामुळे.

याच्या पायाखालची वाळू सरकली, ज्या व्यक्तीला नऊ वर्षांपासून जीव लावला, एकमेकांशिवाय दोघांचं ही होत नसायचं अशी व्यक्ती अचानक दुसऱ्याची कशी काय होऊ शकते. अरे दोन महिन्यापूर्वी तर ती आणि तिच्या घरचे लग्नाला तयार होते. महिन्याभरात लग्न लावून द्यायच्या सुद्धा तयारीत होते. आणि हे सगळं असं कसं झालं? याला काही समजत नव्हतं. त्याला हे सगळं फिल्मी वाटत होत. डोळ्यातून धारा सुरु झाल्या. यार असं कस होऊ शकत? काही वेळ स्मशान शांतात होती. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते, तिच्याकडे पाहत याचा अश्रूंचा बांध फुटला होता. सगळं काही व्यवस्थित चालू असताना हे काय नवीन म्हणत तो फुंदू-फुंदू रडत होता.

ही मात्र त्याला मोठ्या कणखर मानाने समजावत होती, 'राज्या, जमलं तर माफ कर पण परिस्थितीपुढे मी हरले, आता घरच्यांच्या आनंदात माझा आनंद आहे. ती थोडंही दुःख न दाखवता त्याला समजावत होती. 'तू बिलकुल त्रास नाहीस करून घ्यायचा, तुला हे सगळं स्वीकारावं लागेल'.

याला काहीच समजत नव्हतं होत्याच नव्हतं झालं होत... जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती गमावत असताना जगातील सर्व दुःख त्याला होत होते, मात्र त्याचा अजूनही यावर विश्वास नव्हता. हे स्वप्न तर नाही ना म्हणत त्याने स्वतःला चिमटा काढला मात्र हे स्वप्न नसल्याचं जाणवताच अश्रूंचा पाट आणखीच वाढला आन सोबत तिच्या बदलत्या वागण्याचं उत्तरही भेटलं...

- विजय डोळे

No comments