Header Ads

'मेरा भारत महान' म्हणण्याचा अधिकार आहे का?


रगुती सभारंभानिम्मित गावी जायचं असल्याने सकाळी 10 वाजता ऑफिसमधून हाफ-डे घेतला आणि दिगंबरने मला माळीवाडा एस टी स्टॅण्डवर सोडलं. घरच्या ओढीमुळे मी गरबडीतच होतो. साधारणतः 10.30 ला माळीवाडा स्टॅण्डवर पोहोचलो. गेटमधून आत पोहोचल्यावर एका ठिकाणी घोळका दिसला. काय झालं असेल बरं? या प्रश्नाने मी तिकडे ओढलो गेलो. समोरचं लाजिरवाणं चित्र पाहून मन खिन्न झालं. गर्दीतून वाट काढत आत पोहचलो आणि माझ्या तोडक्या-मोडक्या इंग्रजीमध्ये म्हणालो,' May i help you? तसं त्याची आशाभूत नजर माझ्याकडे वळली आणि आमचं संभाषण सुरू झालं. त्याने सांगितलं मी मिकॅले इटलीवरून भारत फिरायला आलोय. यानंतर पुढे काय घडलं, तो भारताबद्दल काय म्हणाला हे भारतीय म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे...

मिकॅलेसमोर शाळेतील लहान मुले, तरुण, मोठी मंडळींनी गर्दी केली होती. या सर्व गर्दीला मी बाजूला करून मिकॅलेला बाजूला घेऊन गेलो आणि त्याच्याशी संवाद साधू लागलो. मला चांगली इंग्रजी बोलता येत नसली तरी इंग्रजी समजू शकतो. त्यामुळे संभाषणात जास्त अडथळा निर्माण झाला नाही. मिकॅले सोबत माझं बोलणं सुरु झालं आणि त्याच्या बोलण्यावरून असं लक्षात आलं कि त्याला अहमदनगर शहरापासून 15 km वर असलेल्या प्रसिद्ध चांदबीबी महलाला भेट द्यायला जायचं होत त्यासाठी बस पकडायची होती. मिकॅले त्यासाठी ऑनलाईनचा आधार घेत होता आणि ऑनलाईनचा भारतात फायदा होत नाही असे लक्षात आल्यानंतर त्याने इतरत्र चौकशी सुरु केली मात्र त्याच्या पदरी भारतीय असल्याचा अभिमान असणाऱ्यांची चेष्टा, हसू आणि चुकीची माहिती पदरी पडली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गेल्या तासाभरात त्याच्या समोर जमा झालेल्या गर्दीतून एकही त्याच्या मदतीला येत नव्हता. ना चौकशी केंद्र, ना पोलीस, ना ड्राइव्हर-कंडक्टर, ना देशाचं भवितव्य? असणारी तरुण पिढी, ना ऑनलाईन केलेला उद्योग.

मिकॅले पूर्ण हताश झाला होता हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. मी त्याला थोडा धीर दिला आणि बस मिळवण्यासाठी मदत करू लागलो. चौकशी दरम्यान समजलं कि पाथर्डी- शेवगावला जाणारी बस चांदबीबीच्या पायथ्याशी थांबते. मात्र पाथर्डी- शेवगाव पाथर्डीला जाणारी एक गाडी आली आणि ड्राइव्हरला विचारलं, साहेब, गाडी चांदबीबीपाशी थांबते का'? साहेब गुर्मीत म्हणाले, 'नाही थांबत!' त्यांना सांगितलं, परदेशी पाहुणा आहे त्यांना चांदबिबीला जायचं आहे. तरीही साहेब त्यांच्या मतावरच ठाम होते. यादरम्यान आजूबाजूच्या नजारा मिकॅलेला गुन्हेगारागत न्याहाळीत होत्या जणू काय त्याने मोठा गुन्हा केला आहे.

मिकॅले मोठी सुट्टी घेऊन इटालीवरून भारत पाहायला आला होता. भारतात आलोय हि खूप मोठी चूक केली हे एकंदरीत त्याच्या देहबोलीवरून ओळखू येत होतं. गेल्या महिना भरातील अनुभव त्याच्या जवळ होता. त्याच्या हातावर काही तरी चावल्याची खूण होती. त्याला विचारलं असता समजलं कि नाशिकमध्ये असताना त्याला एक फिरास्त कुत्र चावलं होतं. अजून मी त्याला थोडं बोलत केलं आणि हताश मिकॅलेकडून जे अपेक्षित होतं ते तो बोललाच. तो म्हणाला, 'भारतात खूप प्रदूषण आहे, इथे कसलीच शिस्त नाही, ना माणसांना, ना प्रशासनाला, ना वाहनांना. ध्वनी प्रदूषण तर सांगायला नको. जो तो सतत विनाकामाचा हॉर्न वाजवत पळत असतो. मिकॅले बोलत असताना मधेच थांबून म्हणाला आपण स्थानकातील बाकावर बसुया. ST ची वाट पाहत आम्ही बाकावर बसलो.

बाकावर बसलो असताना अचानक मिकॅले कोसळला. मला काही सुधरेना, अरे हा आत्ता चांगला होता अचानक काय झालं? असा प्रश्न मला पडला. त्याला आधार दिला आणि विचारलं तर तो म्हणाला मी ठीक आहे. पण पुन्हा काही मिनिटात तो हाथ पाय-खुडू लागला. एवढं सगळं चालू असताना मदतीला एकही धावून येत नव्हतं. मला अटॅकची शंका आली आणि मी आजूबाजूच्यांना म्हणालो कि  रिक्षा घेऊन या. एकही रिक्षा बोलवायला तयार नाही. सगळे तमाशा पाहण्यात व्यस्त. एवढ्यात आशादायी काय ते एक फेरीवाले काका रिक्षाला बोलवायला गेले. रिक्षावाल्याचा पुन्हा एक मुजोर मेसेज ते काका घेऊन आले. 'त्यांना रिक्षापर्यंत घेऊन या मी रिक्षा आत घालणार नाही'. प्रचंड राग आला. करणार काहीच नव्हतो कारण मला मिकॅलेला सांभाळायचं होतं. कसं बस मिकॅलेने स्वतःला सांभाळलं आणि मी त्याला म्हणालो आपण हॉस्पिटलला जाऊ. त्याला थोडं बरं वाटू लागलं होतं. तरीही माझा आग्रह हॉस्पिटलसाठीचा होता. त्याला बाथरूमला जायचं होतं पण एवढं जीवाशी असताना देखील तो सार्वजनिक बाथरूमध्ये नको म्हणालात्याने मला विनंती केली 'विजय प्लिज मला पहिले हॉटेलला घेऊन चल'. तो राज पॅलेसवर थांबला होता. आपण रिक्षाने जाऊ म्हणालो तर पायी जाऊ म्हणाला. आम्ही पायी राज पॅलेसवर गेलो. कदाचित त्याचाही माझ्यावर विश्वास नसावा? त्यामुळे तो मला हॉटेलवर घेऊन गेला. तिथे मॅनेजर विनोद सोनार भेटले. आमची फेसबुकवरची ओळख होतीच. त्यानंतर मिकॅले फ्रेश व्हायला रूममध्ये गेला आणि मी खाली थांबलो.

थोड्यावेळानंतर तो खाली आला. एव्हाना 12.30 वाजले होते म्हणजे यादरम्यान माझे 2 तास गेले. विचार केला आतापर्यंत मी घरी पोहचलो असतो. कारण नगर ते जामखेड 2 तासांचं अंतर आहे. मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं कि मला उशीर होतोय आता फक्त यांना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करा. गेल्या 2 तासात मला पहिल्यांदा चांगले शब्द कानी पडले,' हो सर, आमचे पाहुणे आहेत ते आणि त्यांची सेवा करणं आमचं काम आहे'. मी मिकॅलेला सांगितलं कि तुला हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. काही काळजी करू नको. पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर आता कृतज्ञाचे भाव दिसले. मी त्याचा निरोप घेतला. निरोप घेई पर्यंत त्याने माझे तीन वेळेस आभार मानले. मी त्याला म्हणालो, 'मिकॅले तू भारताचा म्हणजेच माझा पाहुणा आहेस. तुझी सेवा करणं माझं कर्तव्य आहे कारण आम्हाला अतिथी देवो भवची शिकवण दिलेली आहे. आम्हा भारतीयांकडून झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो.' आणि पुन्हा माळीवाडा स्टॅंडकडे निघालो...

जाता-जाता अनेक प्रश्न घर करून गेले. आपण आपली अतिथी देवो भवची संस्कृती विसरून चाललो आहोत का? परदेशी नागरिकांच्या नजरेत आपण कोणता भारत बिंबवत आहोत. आपण एवढे स्वार्थी झालो आहोत का? खरं तर खूप राग आला होता मात्र व्यक्त करू शकत नव्हतो. सुरुवातीला हा लिहिण्याचा खटाटोप केला मात्र लिखाणात देखील प्रचंड शिव्या ओतल्या होत्या. शेवटी विचार केला कि शिव्या देऊन, कोणाला दोष देऊन, राग व्यक्त करून काहीही साध्य होणार नाही. बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. मगच माझ्या नजरेत  मेरा भारत महान असेल आणि मी ते इतरांना देखील म्हणायला भाग पाडेल अन्यथा मला मेरा भारत महान म्हणण्याचा काहीही एक अधिकार नसेल.


विजय लक्ष्मी-विष्णू डोळे


9890740042

4 comments:

  1. खूप छान मित्रा ...तूझ्या सारखा प्रत्येक मानूस जर वागला तर अतिथि देवो भव साक्षात सिद्ध होईल.

    ReplyDelete