Header Ads

'मुडान' ची उडान...



'मुडान' ची उडान...


सध्या चहूकडे चर्चा आहे ती 'मुडान' च्या उडानची. अहमदनगरच्या मातीत तयार झालेला हा लघुपट राष्ट्रीय स्तरावर कौतुकाचा विषय ठरतोय. प्रमोद निक्रड या हुरहुन्नरी तरुण कलाकाराच्या कल्पकतेतून व दिग्दर्शनातून साकार झालेला 'मुडान' खरंच वाखण्याजोगा लघुपट. आत्तापर्यंत 'मुडान' ला तब्बल 9 लघुपट महोत्सवात पारितोषिके मिळाली असून यामध्ये पुणे, मुंबई, नगर मधील लघुपट महोत्सवांचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या 5 व्या माय मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये 'मुडान' ने मारलेल्या बाजीने नगरकरांची मान उंचावलीय. या फेस्टिवलमध्ये 'मुडान'ने बेस्ट ज्युरी अ‍ॅवार्ड, बेस्ट साउंड डिजाईन (अंकुश काळे) व बेस्ट अ‍ॅक्टर (शशिकांत नजान) अवार्ड पटकावला...

नगर शहरातील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडी येथील ग्रुप प्रोजेक्ट अंतर्गत प्रमोद निक्रड, अंकुश काळे व ऋषिकेश कुलकर्णी या तिघांनी मिळून या लघुपटाची निर्मिती नगर तालुक्यातील मांडवा व झापवाडी येथे केली. कथा व दिग्दर्शन प्रमोदने, छायाचित्रण ऋषिकेशने व संकलननाची बाजू अंकुशने लीलया पार पाडली. शेतकऱ्याला एखादे पीक घेताना येणाऱ्या समस्यांवर भाष्य करणारा हा लघुपट आहे. यात शेतकऱ्याला आर्थिक अडचणींचा सामना असो किंवा भौगोलिक, तांत्रिक अशा सर्व स्तरातून असणाऱ्या अडचणी असोत. या सर्वांवर मात करून कष्टाने पिकवलेल्या पिकाची ग्राहकांकडून व व्यापाऱ्यांकडून केली जाणारी अवहेलना उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. त्यातच लघुपटाचा शेवट डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही...

या दर्जेदार कथेला जोड भेटली ती उमदा अभिनयाची. शशिकांत नजान यांनी साकारलेल्या 'आनंदा' भाव खाऊन जातो. तर संकटाशी, परिस्थिशी दोन हात करणारी पत्नी अर्थातच भाग्यश्री कुलकर्णी यांची भूमिका वाखण्याजोगी आहे. लघुपटातील बालकालाकाराची भूमिका साकारणारा 'ईक्या' (यश निक्रड) अभिनयात नवखा असला तरी चित्रपट पाहताना ते अजिबात जाणवत नाही.

कथा, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन व अभिनय अशा सर्व बाजूत उजवा असणाऱ्या या लघुपटाचे पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ऑफिशियल सिलेक्शन झालं आहे. सोबतच अजून इतर ठिकाणी उडान घ्यायला 'मुडान' 'मुडान'ची टीम तयार आहे, मुडान टीमला खूप-खूप शुभेच्छा...! 

No comments