Header Ads

'पद्मावत' - एक जंग हुस्न के नाम


Related image


रणी सेनेचा उन्माद, विविध संघटनेचा बहिष्कार व सेन्सार बोर्डाच्या कचाट्यातून सहजासहजी सुटलेला पद्मावती... अरे सॉरी 'पद्मावत' काल सर्वत्र प्रदर्शित झाला मात्र आज तो सगळीकडे ऑफिशियली प्रदर्शित होणार आहे. खरं तर सिनेमा पाहिल्यानंतर या सिनेमाला विरोध का आहे? हा प्रश्न सहजच मनात येऊन जातो आणि ज्या मेंढरांनी सिनेमाला विरोध केला त्यांच्यानाही हा प्रश्न नक्कीच पडेल! असो आपण मूळ मुद्द्यावर बोलू... तर एकंदरीत काय तर पद्मावत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कसा आहे पद्मावत त्यावर थोडं बोलू...


राणी पद्मावती विषयी बहुतेक जणांना माहिती असेलच कारण, पद्मावत… नाम  मे  ही  सब  छुपा  है… एकेकाळी सौंदर्याची खाण असणारी राणी पद्मावती व जगातील सर्व सुंदर गोष्टींवर स्वतःचा हक्क सांगणारा क्रूरकर्मा अलाउद्दीन खिल्जीच्या एकतर्फी प्रेमाची हि कहाणी. पद्मावती हि सिंघल राज्याची राजकुमारी असते. एक दिवस चित्तोडचे राजपूत राजा महारावल रतन सिंह आणि पद्मावती यांची अपघाती भेट होते व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. यानंतर दोघांचा विवाह होतो व राजा महारावल रतन सिंह पद्मावतीला चित्तोड गडावर घेऊन येतात. पद्मावतीच्या सौंदर्याला राज्याचे ब्रम्हचारी गुरु राघव चेतन भाळतात व असं काही घडतं कि राजा राघव चेतनची राज्यातून हाकालपट्टी करतो. राघव चेतन दिल्ली दरबारी जाऊन खिल्जीचे मन जिंकतो व खिल्जीच्या मनात राणी पदमवतीच सौंदर्य बिंबवतो. राणीच्या सौंदर्याचा फक्त विचार करून अलाउद्दीन खिल्जी तिची एक झलक पाहण्यासाठी काय-काय अग्नितांडव खेळतो हे सिनेमागृहात जाऊन पाहणं अधिक प्रभावी ठरेल.

अभिनय : 

राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण शोभून दिसतेच मात्र यावर तिचा अभिनय, डोळ्यातून बोलण्याचं कौशल्य भाव खाऊन जातं. राणी पद्मावतीच्या सौंदर्याची ज्याप्रमाणे व्याख्या केली आहे तिथंपर्यंत दीपिका पोहचत नसल्याची थोडी का होईना खंत जाणवत राहते. दीपिका सोबतच खिल्जीच्या पत्नीची भूमिका साकारणारी आदिती राव हैदरी सडेतोड उतरली आहे.

सिनेमातील प्रत्येक घटक महत्वाचा असला व तो ऊत्तम मांडला असला तरी रणवीर सिंहने साकारलेली अलाउद्दीन खिल्जीची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. संपूर्ण सिनेमात त्याची सनकी वृत्ती, उधोळखोरपणा, त्याचा उन्माद, रांगडेपणा, पद्मावतीला पाहण्यासाठीची तडप, क्रूरता व जिंकण्याची जिद्द भाव खाऊन जाते. हि भूमिका साकारण्यासाठी रणवीरने अक्षरश: जीव ओतलाय हे प्रत्येक फ्रेममधून दिसून येते. मला जर उत्कृष्ट अभिनयासाठी ऑस्कर द्यायला सांगितलं तर मी डोळे झाकुन रणवीर सिंहला खिल्जीच्या भूमिकेसाठी ऑस्कर देऊन टाकेल.  रणवीर सोबतच त्याचा गुलाम मलिक काफूर म्हणजेच जिम सरभ त्याच्या अभिनय व अदांनी दाद मिळवतो. महारावल रतन सिंहच्या भूमिकेला शाहिद कपूरने जरी योग्य न्याय दिला असला तरी हे पात्र एवढे कमकुवत का दाखवले हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सहज अडून जातो.

दिग्दर्शन : 

‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा या शब्दाला खरा उतरला आहे. प्राचीन काळातील कथा, संस्कृतीला योग्य न्याय देण्यासाठी केलेला अभ्यास व घेतलेली मेहनत नक्कीच उल्लेखनीय आहे. त्याने संपूर्ण सिनेमाला अतिशय सुंदर ट्रीटमेंट दिली आहे. प्राचीन काळ व त्यातील बारीक-बारीक गोष्टी अचूक टिपल्या आहेत. संपूर्ण सिनेमात कुठेही भपकेबाजपणा दिसत नाही. 200 कोटी रुपयांचा असलेल्या सिनेमाची भव्यता शेवटच्या दृश्यापर्यंत दिसण्याचे शिवधनुष्य त्याने पेलले आहे. 2 तास 50 मिनिटांचा असलेला सिनेमा पाहताना खूप लेंदी आहे असं मध्यंतरी जाणवत असलं तरी प्रेक्षकांच्या नजरा पडद्यावरून हालत नाहीत. एवढं सगळं असलं तरी काही तरी कमी असल्याची उणीव कथानकात, दिग्दर्शनात जाणवत राहते.

तांत्रिक गोष्टी : 

सिनेमातील सर्वात जमेच्या बाजू म्हणजे यातील आर्ट, कॉश्यूम व संगीत. अफगाणी, बॉलिवूड व राजस्थानी संगीताचा अनोखा मिलाफ तसेच संचित बल्हराचे बॅकग्राउंड स्कोअर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतो. 30 किलोंचा पोशाख, दागिने चित्रपटांचा थाट वाढवण्यास हातभार लावतात. कॅमेरा व एडिटिंग उत्तम झाले असून सिनेमाचे 3D प्रेक्षपण जमेची बाजू आहे.

एकंदरीत काय तर राणी पद्मावतीचे सौंदर्य, जोह्हर काय प्रकार असतो, राजपुतांचे शौर्य, अलाउद्दीन खिल्जीची क्रूरता हे आपण पुस्तकात वाचत असतो. मात्र याचा जर प्रत्यक्षात अनुभव घ्यायचा असेल, उत्तम दर्जाचा अभिनय पाहायचा असेल व एकंदरीत भव्य-दिव्यता काय असते हे अनुभवायचे असेल तर नक्कीच पद्मावत हा सिनेमा पाहावा...

विजय लक्ष्मी-विष्णू डोळे

9890740042

No comments