Header Ads

'जग्गा जासूस'च्या निमित्ताने...!



दृश्य क्रमांक 1 : चित्रपटगृहात

कोणतीही कलाकृती सादर होत असताना त्यासंबंधितची व्यक्ती त्या कलाकृतीसाठी 100 टक्के देण्याचा प्रयत्न करत असते. त्यात अनुराग बासू सारखा दिग्दर्शक आणि रणबीर कपूर सारखा नट असेल तर 100 + टक्के योगदान असतंच. 'लाईफ इन अ मेट्रो', 'बर्फी' हे याची जिवंत उदाहरणे आपल्या समोर आहेत. हे सर्व सांगण्याचा खटाटोप कारण अनुराग बासूचा 'जग्गा जासूस' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. अनुराग बासूचा चित्रपट पाहिल्यादिवशी न पाहणे म्हणजे काही तरी गुन्हा केल्यासारखं आमच्या मित्रमंडळीला वाटतं. म्हणून मी अक्षय, आदेश, कुलदीप पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यास गेलो.

पहिला दिवस असल्याने थोडीफार? गर्दी होतीच. चित्रपट सुरु झाला. प्रेक्षकांच्या उत्सुकता ताणल्या होत्या. आमच्या तर पहिल्याच ताणल्या गेल्या होत्या कारण अनुराग हा नेहमीच प्रयोगशील दिग्दर्शक राहिला आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून या चित्रपटाची तयारी सुरु आहे. म्हणून तो या सिनेमात नवीन काय प्रयोग करतो हा आमच्या उत्सुकतेचा विषय होता. जसा चित्रपट सुरु झाला आणि पुढे सरकू लागला तसी प्रेक्षकांची चलबिचल सुरु झाली. त्यांची चलबिचल सहाजिकच होती कारण ट्रेलरनुसार आणि रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे यात मुख्य भूमिकेत आहेत म्हटल्यावर त्यांना मसाला, लव्ह स्टोरी असं काहीस अपेक्षित असणारच. पण जसा चित्रपट सुरु होतो व पुढे पुढे सरकू लागतो तसे काही प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडत जाते. म्हणून त्यांची चलबिचल वाढत जाते. काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तर काही जण उठून बाहेर गेले. पहिल्या 20 मिनिटातच जवळपास 40 टक्के प्रेक्षक चित्रपटगृह सोडून गेला होता. या सर्वाचा आम्हावर काही परिणाम होत नव्हता कारण आम्ही अनुराग बासूचा चित्रपट पाहायला आलेलो होतो.

सांगायचा मुद्दा हाच कि, 90 च्या दशकापासून भारतीय सिनेमा विशेषतः बॉलिवूड प्रेम कहाणी, मारामारी, आयटम सॉंग, मसाला यात अडकून पडला आहे म्हणा किंवा प्रेक्षकांची आवड म्हणा (काही अपवाद सोडले तर).  यामागे अर्थकारण जरी असलं तरी यामुळे प्रेक्षक त्यांची चव बदलायला तयार नाहीत कारण तो त्यांच्या सवयीचा भाग आहे. आणि सवयीच्या पलीकडे काही तरी वेगळं आलं तर ते पचनी पडत नाही. म्हणून अनुराग सारख्या प्रयोगशील दिग्दर्शकाला त्याचा परिणाम भोगावा लागतो. असो, हा आपला विषय नाही...

दृश्य क्रमांक 2 : चित्रपटात

'जग्गा जासूस' हा अनुराग बासूने केलेला अप्रतिम प्रयोग आहे. हा एक एडव्हांचर्स, म्युझिकल व रोमॅण्टिक ड्रामा अशा मिक्स प्रकारात मोडणारा चित्रपट. माझ्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये असा प्रयोग प्रथमच झाला आहे. अनुरागच्या या चित्रपटाची चर्चा त्याच्याच 'बर्फी' चित्रपटापासून म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे प्रेक्षकामध्ये याची उत्सुकता लागून होती. अनेक दिवस उत्सुकता ताणल्यानंतर अखेरीस 'जग्गा जासूस' रिलीज झाला.

प्रथम मी चित्रपटाच्या कथेवर बोलेन कारण कथा व पटकथेची मांडणी अतिशय सुरेख आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यापासून ते हसवण्यापर्यंत अनुराग व टीमने मोठे कष्ट घेतलेले दिसून येते. चित्रपटाची कथा आहे जग्गाची (रणबीर कपूर) सर्व कथा त्याच्याभोवतीच फिरते. त्याचा जन्म होण्यापासून चित्रपटाची कथा सुरु होते. एका अनपेक्षित (मनोरंजक रित्या) घटनेपासून त्याच्या 'रेड सर्कल' मध्ये टुटाफुटा ऊर्फ बागची (शाश्वत चॅटर्जी) येतो व तो त्याला वडील मानतो. मग खऱ्या कहाणीला सुरुवात होते. टुटाफुटा त्याला सोडून काही कामानिमित्त निघून जातो. व काही कालावधीनंतर त्याच्या 'रेड सर्कल' मध्ये श्रुती (कतरीना कैफ) येते. हा कथेचा दुसरा भाग असतो. आणि मग पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहातच जावे लागेल...

कथेवर बोलल्यानंतर साहजिकच अभिनयाचा हक बनतो. रणबीर कपूरने अप्रतिम अभिनय केला आहे. दिवसेंदिवस तो परिपूर्ण अभिनेत्याकडे वाटचाल करतो आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेला त्याने पूर्ण न्याय दिला आहे. सोबतच कतरिनाने सुद्धा तिची जबाबदारी चोख बजावली आहे. तर शाश्वत चॅटर्जीने सुद्धा भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.

अनुराग बासूच्या दिग्दर्शनाविषयी बोलावे तेवढं कमीच आहे. काही तांत्रिक अडचणी जाणवत असल्या तरी चित्रपटाचे दिग्दर्शन पटकथेला सुरेख दिशा देण्याचे काम करते. चित्रपटात नावीन्य असले तरी ते भारतीय प्रेक्षकांना जास्त जाणवू न देता त्यांना अपेक्षित आहे त्या अंतरिम टोकाला नेऊन सोडतो. हे दिग्दर्शकाचे मोठे यश आहे.

चित्रपटाचे संगीत हे त्याची महत्वाची बाजू आहे. असणारच कारण संगीत प्रीतम यांचं आहे तर सांगीतिक संवाद अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत. या चित्रपटातील आर्ट, रंग व वेशभूषेविषयी सुद्धा बोलायला पाहिजे. आर्ट, संगीत, रंग व वेशभूशा, अभिनय, दिग्दर्शन यांचं मिक्स प्रोडक्ट म्हणजे जग्गा जासून असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

एकंदरीत काय तर भारतीय सिनेसृष्टीत आगळा-वेगळा प्रयोग असलेला व संगीताने नटलेला 'जग्गा जासूस' पाहायलाच हवा...

- विजय विष्णू डोळे
जामखेड (अहमदनगर)
9890740042

No comments