Header Ads

इंग्रजीचा अट्टाहास कश्यासाठी?

Image result for marathi primary school boy

 

काल व्हॅट्सअप वर एक व्हिडीओ पहिला. त्यात एक लहान मराठी मुलगा मराठी शिकायला नको म्हणत होता. तो व्हिडीओ पाहून धक्का वगैरे काही बसला नाही कारण गेली अनेक वर्षांपासून मराठीची हेळसांड मी डोळ्यांनी पाहतोय. उदाहरण म्हणून देतोय, माझं गाव एक छोटंसं खेड आहे. साधारणतः 600 लोकवस्तीचं. आता कुठे अर्धा पक्का रस्ता झालाय. गावात 4 थी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. (माझं प्राथमिक शिक्षण याच शाळेत झालंय) साधारणतः 40 विद्यार्थी असतील शाळेत. नुकतंच शाळेला ISO मानांकनही मिळालंय. शाळेचा विकास साधतोय. शिक्षकही त्यांची भूमिका पार पाडतायत. पण दर्जेदार शिक्षण असताना आमच्या या लहानग्या गावात इंग्रजीच फॅड आलंय. प्रत्येकाला वाटत माझं पोरगं इंग्रजी शाळेत गेलं पाहिजे. (भावकीचं पोरगं इंग्रजी शाळेत गेलं कि माझं पण इंग्रजी शाळेत गेलं पाहिजे असा अट्टाहास जास्तकरून महिलांचाच) पोराला नीट बोलता येत नसलं तरी पालकांचा आग्रह हा इंग्रजी शाळेसाठी असतो. हा अट्टाहास कश्यासाठी? गावात ISO मानांकित शाळा आहे. मुलांना 32 इंची LCD वरून शिक्षण दिल जात, शाळेत विद्यार्थ्यांना टॅब आहेत, कॉम्पुटर आहेत, इथेही इंग्रजी शिकवतात. मग इंग्रजी शाळेचा आग्रह कशासाठी?

उदाहरण म्हणून मी माझ्या गावाचा दाखला दिला. पण हीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतर गावाची नसेल कशावरून. गावात जर चांगल्या शिक्षणाची सोय नसेल, पर्याय नसतील तर इंग्रजी शाळेचा पर्याय ठीक आहे पण पर्याय उपलब्ध असताना असा पर्याय निवडला जातो त्याच वाईट वाटत. उदाहरण जरा मोठं होतंय पण नेमकी चूक कोणाची आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्या व्हाट्सअप मधील लहानग्यांची काही चूक नाहीच. चूक पालकांची, आसपासच्या वातावरणाची आहे. इंग्रजीचा आपण स्वतःहून बाऊ करून घेत आहोत. त्याच ओझं पालकांवर लादण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला नाही झेपलं तरी त्याला इंग्रजीचा गाडा बळच ओढायला लावत आहोत.

जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी महत्वाची आहेच याबद्दल माझं दुमत नाही पण इंग्रजीमुळे एवढं पण काही आडत नाही. कामापुरती किंवा त्यापेक्षा जास्त इंग्रजी प्राथमिक शाळेत शिकवली जातेच की. आज एक मुलगा मराठी द्वेष करतोय, उद्या हजारो असणार आहेत आणि हा प्रवाह रोखणं खूप अवघड जाणार आहे. एका शिक्षणतज्ञानी म्हटलं आहे की, 'मुलांचं शिक्षण हे त्याच्या मातृभाषेतून झालं पाहिजे तरच त्याचा सर्वात्मक विकास साधायला मदत होते'.

तात्पर्य हेच की, मराठीचा जागर होणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने सुरुवातीला मराठी संबंधित काही ठोस पाऊले उचली होती पण नंतर ती बारगळली. किमान प्रादेशिक पक्षाने मराठीचा आग्रह लावून धरला पाहिजे. मराठी भाषा संवर्धन चळवळ व्यापक झाली पाहिजे. नाहीतर मराठी भाषा दिन हा केवळ मराठी भाषेचा स्मरण दिन म्हणून उरेल.

- विजय विष्णू डोळे
जामखेड (अहमदनगर)

No comments