Header Ads

लैगिंक असमानतेची वाभाडे काढणारा 'लिपिस्टिक अंडर माय बुरखा'

Image result for lipistic under my burkha




आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. 21 व्या शतकातही ती आजतागायत आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या व्यवस्थेने स्त्रीयांचे हक्क नाकारले आहेत. त्यात 'सेक्स' हा तर खूप लांबचा विषय येतो. याच लैगिंक समानतेचे वाभाडे अलंकृता श्रीवास्तव यांच्या 'लिपिस्टिक अंडर माय बुरखा' मध्ये काढण्यात आले आहेत. लैंगिक असमानतेचा बुरखा फाडण्या इतपत हा सिनेमा मर्यादित राहत नाही तर स्त्रीयांवर लादण्यात आलेल्या बंधनावरही भाष्य करतो.

ही कथा बुवाजी, शिरीन, रिहाना व लीला या चार स्रियांची आहे. संपूर्ण स्त्री जातीचं प्रतिनिधित्व या चार स्रिया करतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असणाऱ्या या स्रिया व त्यांची मानसिकता व समाजाची बंधने याभोवती या सिनेमाची कथा फिरते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारी रिहाना, भर तारुण्यात असणारी व सेक्सची भुकेलेली लीला, कुटुंब सांभाळून करियरचा विचार करणारी व वैवाहिक बलात्काराची बळी असलेली शिरीन तसेच आयुष्याची पन्नासी ओलांडलेली व या वयातही शरीर सुखाला आसुसलेली बुवा. अगदी प्रत्येकाचा वेग-वेगळा टप्पा दिग्दर्शिकेने मुद्दामहून मांडलेला पाहायला मिळतो. तारुण्याची पहिली पाहिरी चढत असताना ते उतरत्या वयाकडे वाटचाल करत असताना स्त्रीचे प्रश्न व तिच्या गरजा समान आहेत. प्रत्येक टप्प्यावर ती समाजाशी झगडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सिनेमापलीकडच्या खऱ्या-खुऱ्या जगतातली खरी-खुरी परिस्थिती दिग्दर्शकाने खुबीने मांडली आहे व तो त्यात यशस्वी सुद्धा झाला आहे.

उतरत्या वयात शरीरसुख मिळवण्यासाठी बुवा ने उचललेले पाऊल व त्यानंतर समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नवऱ्याच्या बलात्काराविरोधात ब्र ही न काढणारी पण स्वप्न पाहणारी शिरीन. (खरं तर आज नवऱ्याकडून होणाऱ्या बलात्काराच्या 90% महिला बळी आहेत. सेक्स करताना स्त्रीला काय वाटते किंवा तिची भावना काय आहे, ती सेक्ससाठी तयार आहे का? याचा कोणताही विचार न करता आपले पुरुषत्व खूपसाऊन स्वतःची इच्छा तृप्त करून घेणारे पुरुष हे बलात्कारिच असतात.) लग्नाच्या वयातील 'लीला' तिच्या बॉयफ्रेंड सोबत जगण्याचा मनमुराद आनंद घेत असते. स्वप्न मोठी असतात पण तिचं लग्न ठरत आणि लग्न ठरल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंड सोबत ती सेक्ससाठी पेहल करते तेव्हा तो तिला म्हणतो,'सेक्स करने की इतनी खुजली है तो और चार लडके को बुलाऊ क्या'. यावरून स्त्रीने सेक्सला पेहल केली असता समाज तिला कोणत्या अँगलने पाहतो याचे दर्शन होते. यात राहिली रिहाना, ती तारुण्यात येत असताना समाज तिच्यावर किती बंधने लादतो हे बुरख्याच्या प्रसंगावरून पुढे येते. आपल्याच स्वप्नांत जगणारी रिहाना सर्व बंधने सहन करून चोरून चोरून स्वप्न पूर्ण करताना दिसते.

या सिनेमाविषयी बोलावं तेवढं कमी आहे.  दिग्दर्शन, अभिनय, बॅकग्राउंड स्कोअर, छायाचित्रण व मांडणी अप्रतिम आहे. यामधील डायलॉग अप्रतिम आहेत. त्यातील एक 'बीवी हो, शौहर बनने की कोशिश मत करो'. व 'पता है दिदि हमारी गलती क्या है, हम सपने बहोत देखते है'. यातून पुरुषी मानसिकता समोर येते.

आता म्हणाल की बुरखा या शब्दाचा उल्लेख सिनेमाच्या टायटल मध्ये केला आहे म्हणजे हा सिनेमा कोना एका धर्मावर भाष्य करतो कि काय? पण नाही हा सिनेमा कोणा एका धर्मावर बोलत नसून संपूर्ण समाजव्यवस्थेवर प्रश्नचिह्न उपस्थित करतो. बुरख्याचा अर्थ येथे परंपरा म्हणून उल्लेखला आहे.

विजय विष्णू डोळे
जामखेड (अहमदनगर)
9890740042

4 comments: