Header Ads

प्रेम आणि समाज


 
 
 


वेडीच होती ती, म्हणायची माझ्या घरचे माझ्यापुढे जाणार नाहीत. तो त्या भोळीला सांगणार तरी कसा होता की, बाई ग हा समाज एवढा सहजा सहजी दोन जिवांना एकत्र येऊ देणारा नाही. नशीब किमान ती त्याच्या 'जातीची' तरी होती. पण शेवटी सामाजिक रूढीपरंपरा, समाजबंधने आणि वयापुढे ती हरलीच.

स्वतःपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करणारी ती, तो कितीही रागावला तरी त्याच्या मिठीला आसुसलेली ती, फक्त एकदा पाहण्यासाठी सुद्धा तांडव करणारी ती, तिच्या स्वप्नापेक्षा त्याच्या स्वप्नात गुंतलेली ती अशा तिच्या नाना छटांमध्ये तो हरवून गेला होता. द्विधा मनःस्थितीत अडकला होता बिचारा! कसा तरी सावरण्याचा प्रयत्न करत होता स्वतःला.

मी अगदी जवळून पाहत होतो माझ्या मित्राला आणि त्याच्या अधुऱ्या प्रेम कहाणीला. सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं. जणू तुमची आमची कहाणीच होती ती? काय चूक होती दोघांचीही, 'फक्त प्रेम'? आपल्या समाजाला एवढा का तिटकारा आहे प्रेमाचा. तू, ती, ते, तो सर्वांनी प्रेम केलंय मग तिच्या आणि त्याच्या प्रेमाचा तिटकारा का? स्वतःच्या पायावर उभी राहू पाहणारी, एकमेकांची साथ घेऊन स्वप्नांचा पाठलाग करणारी ती दोन मनं सामाजिक बंधनापुढे कोमेजली होती. एक दिवस राहिली असती स्वतःच्या पायावर उभी, आर्थिक स्थैर्यही मिळवलं असतं. पण तिचं हित जपत असताना तिच्या मनाचे तुकडे करणाऱ्यांना, तिला उध्वस्त करणाऱ्यांना कसं समजावून सांगणार होता तो आणि कितपत पचणार होतं ते त्यांना?

'नौटंकी होती सारी सगळी, साला आपलं नशीबच गांडू'. म्हणून दिवस काढत होता तो. करणार तरी काय होता? तिचा नेहमी आग्रह असायचा 'चल दूर जाऊ या जगापासून मला नाही राहायचं इथं'. तो ऐकणार थोडी होता. त्याला त्याची तत्व, घरच्यांवरच प्रेम आणि त्याच्या प्रेमावर असणारा विश्वास आणि सरळ मार्ग सोडून पळवाटा शोधणं, मारामारी करणं त्याच्या पचनी पडत नव्हतं. पळून पळून पाळणार होता कुठंपर्यंत आणि कोणापासून?

तिला पाहायला आले कळलं तरी कोलमडणार तो आणि रात्र-रात्र जागणारी ती... कसं जमणार होतं सगळं? उध्वस्त होणार होतं का सगळं? तिच्या घरच्यांना आणि त्याला कळेल का तिच्या मनाची घालमेल? खोट्या प्रतिष्टेपाई अजून किती मनं तुटणार आहेत? आपला समाज कधी स्वीकारणार आहे प्रेमाला? अशी अनेक प्रश्न शेवटी अनुत्तरीत राहतात आणि वाट पाहणं हातात राहत...

- विजय डोळे

(अभिनव बसवर याच्या पोस्टवर प्रभावित होऊन)

1 comment: