Header Ads

वंजारी समाज व भगवानगड



राजकीय समीकरणात 'एकगठ्ठा' समाजाला जाणारा वंजारी समाज सध्या भरकटताना दिसतोय. धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता हे याला करणीभूत आहे. अठरापघड जातीतील वंचितांचा आसरा म्हणून भगवानगडाचा उल्लेख होतो. एवढंच नाही तर सत्तेची गणितही कित्येकवेळा इथूनच फिरली आहेत. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंढे आणि भगवानगडाचं समीकरण हे संपूर्ण देशाला ज्ञात होतं.

भगवानबाबांनी पाथर्डी तालुक्यात या गडाची स्थापना केली. गोर-गरिबांना शिक्षणापासून ते समाजसुधारणापर्यंत कित्येक कामे बाबांनी केली. बाबांच्या याच शिकवणीला व बाबांच्या कामाला सध्या पायदळी तुडवण्याचे काम सुरु आहे. याला मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्षरित्या महंत नामदेव शास्त्रीच कारणीभूत आहेत.

भगवानबाबांच्या नंतर गडाला नावारूपास आणण्याचे सर्व श्रेय गोपीनाथ मुंढे यांचे आहे. गडाचा विकास असो वा प्रसार हा डोलारा मुंढे यांनीच पेलला होता. अर्थात यात त्यांचा राजकीय फायदा होताच हे नाकारून चालणार नाही. पण शेवटी विकास महत्वाचा असतो, तो त्यांनी साधला. भीमसिंग महाराजांनंतर गादीवर आलेले शास्त्री हे डॉक्टरेट झालेले. ते गडाचा विकास व प्रसार अजून झपाट्याने करतील असं वाटत असताना त्यांनी घोर निराशा केली. विकास बाजूला आणि हा गडी राजकारणातच जास्त रमला. यामुळे गेल्या 4 वर्षांपासून गडाचा विकास ठप्प आहे. अनेक वाद, घोटाळे व गुंड प्रवृत्तीचे कामे बाहेर येऊ लागले. आता या आरोपात किती तथ्य आहे हे तपासातून सिद्ध होईल पण लाखो लोकांच्या श्रद्धास्थानांला यांनी ज्याप्रकारे मालिन केलं आहे, अशांततेची कामे व समाजात दुफळी निर्माण करण्याचे कामे केले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शास्त्रीच आहेत.

कै. गोपीनाथजी मुंढे व प्रमोदजी महाजन यांनी या गडाचं धार्मिक व राजकीय महत्व जाणून या गडाला राष्ट्रीय ओळख करून दिली. म्हणूनच वंजारी समाज भगवानबाबा, भगवानगड व गोपीनाथ मुंढे या तिघांनाच ओळखतो व मानतो. यामुळे मुंढेंची समाजावर पकड होती, त्यांच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांनी कधीही समाजात फूट पडून दिली नाही. कारण मुंढे व त्यांचे विरोधी दोघेही जाणून होते की, 'समाज एकगठ्ठा' आहे तोवर यांच्या वर्चस्वाला धक्काही लागणार नाही. पण राजकीय विरोधकांना मुंढेच्या मृत्यूनंतर संधी चालून आली आणि त्यांनी काही डावपेच आखले. यात समाजाचे दुसरे नेतृत्व बाहुले म्हणून समोर येऊ लागले आणि त्याला साथ महंतांची मिळते अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ज्या गडावर अमित शहा, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, छगनराव, वसंतराव नाईक अशी दिग्गज मंडळी येऊन जातात. फक्त येत नाहीत तर ते सत्तेची गणितं आखून जातात. अशा गडावर अचानक मुंढेच्या वारसदार मंत्री पंकजा मुंढे यांची सभा नाकारण्याचं कारण काय? तसं पाहायला गेलं तर पंकजांना गडावर भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण समाजबळ त्यांच्या बाजूने आहे आणि हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या वर्षी अनुभवलंय. यातून शास्त्रीना काय साध्य करायचं आहे? यामुळे होणाऱ्या नुकसानाचा त्यांनी विचार केला आहे का? त्यांच्या या निर्णयामुळे सहाजिकच अनेक प्रश्न पुढे येतात व महंत शास्त्रीच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो?

नंबर 1 : असा निर्णय घेण्यास कोणी भाग पडले व अचानक गडाचे कोणते नियम भंग होऊ लागले?
नंबर 2 : पंकजा महिला आहेत म्हणून शास्त्री गडावर भाषण करू देत नाहीत का?
नंबर 3 : यामागे शास्त्रीना कोणी राजकीय वरदहस्त तर नाही ना?
नंबर 4 : वंजारी समाजातील एकी कोणत्या पक्षाला धोकादायक आहे? या समाजात धुफळी निर्माण झाल्यास कोणाला फायदा होणार आहे?
नंबर 5 : अनेक आरोपातून पंकजांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असफल झाल्याने ही राजकीय सूडबुद्धी तर नाही ना?
नंबर 6 : मुंढे-शास्त्री-मुंढे वादापलीकडे जाऊन यामागे दुसरा कोणा राजकीय शक्तीचा हात असू शकतो काय?

या निर्णयामागे अनेक शक्यता असल्या तरी यातून समाज भरटकतोय, गडाचा विकास ठप्प आहे, समाजात दहशतीचं वातावरण निर्माण होतंय, भगवानगडाची बदनामी होतेय, मुंढे भावा-बहिणेचे संबंध अजून ताणले जातायत, तरुणवर्ग आक्रमक व हिंसक होतोय. एवढ्या साऱ्या गोष्टी होतं असताना गादीचा मान ठेऊन किमान शास्त्रीनी एक पाऊल मागे घेणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर येणारी पिढी व इतिहास हा शास्त्रीना कदापी माफ करणार नाही. कारण एकवेळेस राजसत्तेला माफ केलं जाऊ शकतं कारण त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असतो पण धर्मसत्तेला कधीही माफ केलं जाऊ शकत नाही कारण ती एका जबाबदार व्यक्तीची गादी असते. त्याप्रमाणे वागणं हे त्यांना बंधनकारक असतं...!

विजय डोळे, जामखेड
9890740042

No comments