Header Ads

शिक्षक दिनानिमित्त...






माझ्या जडणघडणीत आज प्रत्येक गुरुचा वाटा आहे. सुरुवात माझ्या जन्मदात्यापासून झाली असली तरी त्यांच्या एवढाच वाटा माझ्या गुरूंचा आहे कारण गेली 10 वर्ष झाली मी घरापासून सतत लांब गुरूंच्या सहवासात आहे.

प्राथमिक शिक्षण  : प्राथमिक शिक्षण घेत असताना मोहिते सर, मोहिते मॅडम व घोडके सर यांचं मिळालेल्या प्रेमामुळे मला शिक्षणाची आवड निर्माण झाली.

माध्यमिक शिक्षण (6 व 7 वी) :  माध्यमिक शिक्षण घेत असताना सर्व प्रथम गणित शिक्षक व आमचे क्लास टीचर हुलगुंडे सर कारण त्यांनी मला टोमणे मारून-मारून (मी अभ्यास करावा म्हणून) वर्गात दुसऱ्या नंबरवर आणून ठेवले होते. तेंव्हा पासून आजतागायत मी नंबर सोडले नाहीत.

माध्यमिक शिक्षण (8 व 10 वी) : गणित विषयाचे म्हत्रे सर, यांची शिकवायची पद्धत एकदम वेगळी. बोर होण्याचा विषयच नाही. काही जणांना ती अश्लील वाटत असली तरी सरांमुळे माझे समीकरणं व प्रमेय तोंडपाठ असायची. (काही प्रमाणात आजही विसरलेलो नाही) ते सतत मला प्रोत्साहन द्यायचे कारण मी खूप लाजरा बुजरा व आत्मविश्वास नावाचा प्रकार माझ्या जवळपासही नव्हता. पण मला ते सतत फळ्यावर उदाहरण द्यायचे आणि कुणाला नाही आले तर मला सोडायला लावायचे. (अनेक वेळेस गणिताच्या चाचणीचे पेपरही मी तपासले आहेत.) स्वप्न पाहायला व न्यूनगंड दूर होण्याला इथूनच सुरुवात झाली.

11 वी 12 वी : हे दोन वर्ष कसे संपले ते कळलंच नाही. इथे जरा भरकटलो तो आजपर्यंत सावरण्याचा प्रयत्न करतोय. या दोन वर्षात असं कोणी मार्गदर्शन करणार भेटलंच नाही. (फिजिक्स असो कि मॅथेमॅटिक्स सर्वांच्या हिटलिस्टवर डोळे पाटील असायचे) अगदी मोक्याच्या क्षणी असं का घडलं? हा प्रश्न आजही पडतो. असो पण याच काळात मला इंग्रजी क्लासचे चव्हाण सर भेटले, त्यांनी एक दिवस वडिलांना बोलावून घेतलं, घाबरलो तर होतोच कारण आपले पराक्रम तेवढे. वडिलांना ते म्हणाले, 'पोरगा खूप हुशार आहे. एक दिवस तो खूप मोठा होईल. त्याला पुण्याला पाठवा शिकायला'. (जशाच तसे शब्द आहेत त्यांचे) पण विस्कटलेली घडी बसणं जरा अवघड असतं.

D.Ed चा प्रवास : यानंतर सुरु झाला D.Ed चा प्रवास. माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणायला हरकत नाही. शिक्षकांचं बारकाईने लक्ष, वैयक्तिक मार्गदर्शन, प्रेम, अपमान आणि शिक्षा सर्व काही भेटलं. आणि यातूनच शिकलो. आत्मविश्वास वाढला, न्यूनगंड कुठच्या कुठं पळाला, स्टेज डेअरिंग वाढली, वैचारिक भूक लागण्यास सुरुवात देखील येथेच झाली. दोन्ही टेंभेकर सर, भोकरे सर यांचं मार्गदर्शन व शिकवण आजही कामी येतेय. मी खूप चिडखोर होतो यावर पिंगळे मॅडम व आमच्या प्राचार्या कुलकर्णी मॅडम यांनी नियंत्रण आणलं. तासनतास त्या मला मार्गदर्शन करायच्या. खरं तर या सर्वांसोबतच्या 3 वर्षामुळे मी आज उभा राहिलो.

महाविद्यालयीन शिक्षण व राजकारण : नंतर महाविद्यालयीन शिक्षण असंच गेलं. थोडी राजकारणाची ओढ लागली. मी लक्ष्मण कानडे साहेब व मनसे दक्षिण जिल्हाअध्यक्ष सचिन पोटरे साहेबांच्या सानिध्यात आलो. त्यांनीही खूप काही शिकवले. जबाबदाऱ्या दिल्या व त्या पार पडायला शिकवले. (विशेष म्हणजे मला जामखेड तालुका विद्यार्थी सेनेची कार्यकारणी निवडायची जबाबदारी दिली होती. अशा अनेक कामातून त्यांनी मला खूप काही शिकवले. भाषणे करायची संधी दिली.)

मास्टर डिग्री : राजकारणानंतर मी मास्टर करायला नगरला आलो. मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला आणि मला एक दृष्टी मिळाली. एक मार्ग मिळाला. विभाग प्रमुख बापू चंदनशिवे सर, अनंत काळे सर, संदीप गिऱ्हे सर, अभिजित गजभिये सर, श्वेता बंगाळ मॅडम यांचं आजही मार्गदर्शन मिळतंय. माझ्या प्रत्येक समस्येचं निराकरण येथे होतं.

हे झालं माझ्या शालेय गुरु विषयी पण इथंपर्यंत पोहोचण्यात महत्वाचा वाटा होता तो म्हणजे आमचे 'नानां' विक्रम डोळे यांचा. नाना प्राथमिक शिक्षक, जिथे जातील तिथे त्यांचा दरारा. शिकवण्यात त्यांचा हाथ कोणी धरू शकणार नाही. नानांचं मार्गदर्शन व दरारा असल्याने मी इथपर्यंत पोहचलो. ते नसते तर कदाचित मी गावगुंड असतो किंवा टवाळक्या करत फिरलो असतो. शाळेत जायच्या अगोदरपासून असो कि दहावीचं वर्ष असो मी आणि नरेंद्र त्यांच्याजवळ असायचो. शाळेतून आल्यावर ते आमचा अभ्यास घायचे. यामुळे टवाळक्या करत हिंडायची बिशाद आमची कधी झालीच नाही.

म्हणूनच माझ्या सर्व गुरूंचा तर मी खूप आभारी आहे पण विशेष आभार नानांचे... तुम्ही सर्व होते म्हणून मी आज धडपडतोय, उंच भरारी घेऊ पहातोय.

Thank you हे शब्द अपुरे आहेत पण तरीही thank you teachers & NANA

No comments