Header Ads

29 पासून 'घुमा'चा नगरी आवाज घुमणार


गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात चित्रपट संस्कृती रुजू पाहत आहे. भाऊ कऱ्हाडे यांचा ख्वाडा, नितीन अडसूळ यांचा 'परतू' सारखी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. मुंबई, पुणे, कोल्हापूर यांची चित्रपट क्षेत्रावर असलेली मक्तेदारी मोडत नगरची मंडळी सिनेसृष्टीत उभे राहू पाहत आहेत. याच मंडळींमध्ये नगर तालुक्यातील खडकी येथील अवघ्या 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. महेश रावसाहेब काळे असे या तरुणाचे नाव असून कमी वयातच दिग्दर्शक होण्याचे स्वप्न याने पूर्ण केले आहे. येत्या 29 सप्टेंबरला महेशचा 'घुमा' संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

महेश हा मुळात ग्रामीत भागातील असल्याने आपल्या भागातील समस्या मोठ्या पडद्यावर मांडण्याचा कयास महेशने केला होता. ग्रामीण भागातील समस्यांचा खोलवर अभ्यास करताना त्याला मराठी शाळा व इंग्रजी शाळा यांच्यातील भयाण वास्तव नजरेस पडले. या समस्येवर बोललेच पाहिजे हा हट्ट धरून महेशने घुमाची निर्मिती केली. या चित्रपटामध्ये इंग्रजी शाळांमध्ये मुले पाठवण्याची फॅशन मूळ मराठी शिक्षण पद्धतीला कशी मारक आहे, याचं वास्तववादी चित्र मांडण्यात आले आहे. 

या चित्रपटाला संपूर्ण ग्रामीण गंध असून यासाठी गुरु ठाकूर यांनी दोन गाणी लिहिली आहेत. तर संगीत जसराज जोशी, ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांनी दिले आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले असून, गाणी अजय गोगावले, प्रिया बर्वे आणि मुग्धा हसबनीस यांनी गायली आहेत. 

प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांची पसंती

येत्या 29 सप्टेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत असला तरी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये 'घुमा' रसिकांच्या पसंतीला उतरलाय. या चित्रपटाने यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड मिळवला आहे. शिवाय राज्य सरकारतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. यासोबतच चित्रपटाच्या गाण्यावर महाराष्ट्राने ठेका धरला आहे. चित्रपटाचा ट्रेलर, प्रोमो आदींवर रसिकांच्या कौतुकाचा वर्षाव होतोय. चित्रपटातील गाण्यांचा हक्क झी म्युझिक कंपनीने विकत घेतला असून सोशल मीडियावर लाखोंवर व्हिव मिळत आहेत.

कलाकार, दिग्दर्शकापासून ते प्रोडक्शन पर्यंत सर्वजण 'नगरी'

घुमा चित्रपटाची अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे यातील कलाकार, दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता व प्रॉडक्शनची टीम सर्वजण नगरचे आहेत. यामध्ये प्रमुख कलाकार आदेश आवारे, शरद जाधव, प्रमोद कसबे, नाना मोरे, आशा साठे, तेशवानी वेताळ, हरीश बारस्कर, कल्पना काळोखे हे सर्व कलाकार अहमदनगरच्या मातीत घडलेले आहेत.

घुमासाठी महेशसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले अविनाश मकासरे, विक्रम शंकपाळे, अक्षय देशपांडे, विशाल सरोदे, कुलदीप कांबळे हे सुद्धा अहमदनगरचे सुपुत्र आहेत. यासोबतच कार्यकारी निर्माता मंगेश जोंधळे, असिस्टंट अर्जुन राजपुरे व प्रोडक्शनसाठी अजय थोरात, गौरव पठाडे, सुमित भिंगारे  व विकास गोसावी, सहायक कला दिग्दर्शक शिवाजी काळे ही सर्व मंडळी अहमदनगरच्या मातीत वाढलेली आहे.

विजय डोळे
9890740042

No comments