Header Ads

क्रिकेटचा देव : सचिन रमेश तेंडुलकर

 


क्रिकेट म्हटलं की, सचिन. क्रिकेट खेळातील अखंड महाकाव्य, क्रिकेटचा बादशहा, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, चँपियन अशी अनेक त्याची नावे. पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न, राज्यसभा सदस्य हे भारत सरकारकडून मिळालेले सर्वोच्च सन्मान. सर्वाधिक जागतिक विक्रम असलेला क्रिकेटपटू म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल 1974 हाच तो दिवस ज्यादिवशी काळाने दिवाळी साजरी केली कारण एका महान व्यक्तिमत्वाने जन्म घेतला होता.

आज सचिनचा 44 वा वाढदिवस. आजही सचिन 44 चा वाटत नाही किंवा 4 वर्ष क्रिकेटपासून लांब असला तरी आजही तो मैदानात चौकार षटकार मारून धावांचा पाऊस पडतोय याचा भास होतो. सचिनचा खेळ पाहून आजघडीला सर्वात जास्त क्रिकेटपटूंचा जन्म झाला आणि पुढे होईलही. त्यातलं आजघडीचं अव्वल नाव म्हणजे विराट कोहली. वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून 24 वर्षाच्या अखंड क्रिकेट कारकिर्दीत जवळ-जवळ सर्वच विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केले असले तरी त्याने टीम इंडिया व भारताचे नाव पूर्ण जगभर एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले.

पाकिस्तानविरुद्ध 15 नोव्हेंबर 1989 रोजी क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या या अवलियाने 14 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटला अलविदा केला. या 24 वर्षाच्या कालावधीत त्याने 16 मार्च 2012 रोजी मीरपूर येथे बांगलादेश विरुद्ध शतकांचे शतक ठोकून कधीही न तुटू शकणाऱ्या विक्रमाला गवसणी घातली. या प्रवासाबद्दल अनुभव शेअर करण्यासाठी त्याने 2014 साली 'Playing It My Way' हे आत्मचरित्र देखील प्रकाशित केले.

सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

1994 - अर्जुन पुरस्कार

1997-98 - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

1999 - पद्मश्री

2001 - महराष्ट्र भूषण

2008 - पद्मविभूषण

2014 - भारतरत्न

2012 - राज्यसभेचा खासदार

भारतीय विमानदलाने सचिनला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक सन्मान प्रदान केला आहे.

राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत.

6 नोव्हेंबर 2012 रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.

सचिनच्या नावावरील काही खास विक्रम

200 कसोटी सामन्यात 15,921 धावा. यामध्ये 51 शतकं व 68 अर्धशतकं

463 वन डे सामान्यात 18,426 धावा. यामध्ये 49 शतकं, 96 अर्धशतकं

विश्वचषकात सर्वाधिक 2,278 धावा

एका विश्वचषकात सर्वाधिक 673 धावा (2003)

सर्वाधिक 62 वेळा सामनावीराचा मानकरी

आंतरराष्ट्रीय सामन्यात 200 विकेट

फक्त क्रिकेटचं नाही तर सामाजिक भान जपणारा सचिन आज जग पाहतोय. शिक्षणापासून मुले वंचित राहू नये म्हणून धडपड असो किंवा गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करणं असो यामागे सचिनची तगमग दिसून येते.

ज्याच्यापुढे काळही नतमस्तक झाला, अशा या महान खेळाडूस वाढदिवसाच्या दिले से शुभेच्छा...!

No comments